सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनजवळ असलेल्या फडतरवाडी या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील एक मृतदेह ग्रामपंचायत कार्यालया समोर दहन करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून पर्यायी जागेची पाहणी करून स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला.
कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी येथे देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन नजदीक असलेल्या फडतरवाडी या गावात स्मशानभूमी नसल्यानं मरणानंतरही मृत्यूदेहाला हाल अपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने गावकऱ्यांनी आपली एकजूट दाखवत निषेध व्यक्त केला.
दरम्यान आज सकाळी जोरदार पाऊस पडत असल्याने गावात आकस्मित मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूदेह ग्रामपंचायतीसमोर जाळण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी गावकऱ्यांनी कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम व गट विकास अधिकारी क्रांती बोराटे यांना बोलावून अडलेल्या स्मशानभूमीबाबतचा जाब विचारला. यावेळी संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झालं होतं. मात्र,पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे संपूर्ण वातावरण निवळलं. यानंतर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा निवडण्यासाठी गावातील आजूबाजूच्या भागाची पाहणी केली व यावेळी स्मशानभूमीसाठी शासकीय जागेची निवड करण्यात येईल असा शब्द दिला.
आमदार साहेब डोंगर राहूदे, स्मशानभूमी उभी करा
कोरेगाव तालुक्यात आ. महेश शिंदे आणि विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे हे दोघेजण आहेत. तरीही स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. या दोन्ही आमदारांकडून कोरेगाव तालुक्यातील विकास कामांचा डोंगर उभा केला असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. तेव्हा फडतरवाडीत डोंगर उभा करायचे राहूद्या, स्मशानभूमी उभी करा अशी म्हणण्याची वेळ फडतरवाडी येथील ग्रामस्थांच्यावर आली आहे.