सातारा | दहिवडी (ता.माण) येथील रयत शिक्षण संस्थेचे परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात इयत्ता दहावीत विद्यार्थिनी कु.स्वरा दिपक टकले शिकत होती. बोर्ड परिक्षाच्या तोंडावर तिचे वडील दीपक टकले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीतही कु. स्वराने मोठ्या धैर्याने स्वत:ला सावरत जिद्दीने अभ्यास करत पैकीच्या पैकी गुण मिळवले. स्वराने या परिक्षेत 100 टक्के गुण मिळवित आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करत त्यांना या निकालाची श्रध्दांजली वाहिली. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दहिवडी येथील परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात इयत्ता पाचवीपासून शिक्षण घेणारी कु.स्वरा हुशार व संस्कारशील मुलगी म्हणून ओळखली जात होती.तिला लहानपणापासूनच शिक्षणाचे व संस्काराचे धडे घरातूनच तीचे वडील दिपक टकले व आई दिव्या टकले यांचे कडून मिळाले होते. आईवडील दोघेही उच्चशिक्षित असल्याने ते कायमच आपल्या मुलीला ज्ञानाचे धडे देत असत. वडीलांची लाडकी असलेल्या स्वराने दहावीत पैकीच्या पैकी गुण मिळवून आई वडीलांचे नाव उज्वल करावे असे तिच्या वडीलांचे स्वप्न होते.
काही दिवसांवर बोर्डाची परिक्षा आल्याने कु. स्वराने वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आईवडील व गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र, काळाने त्यांच्या कुटुंबावर आघात करत तिच्या वडीलांना सर्वांपासून हिरावून नेले. त्या धक्क्यात सर्वच कुटुंबाची वाताहात झाली. स्वराची आई दिव्या टिकोळे यांनी मुलांकडे पाहत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धाडसाने त्या उभ्या राहिल्या. वडीलांची कमी जाणवणार नाही, याची काळजी घेत मुलीला वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलगी स्वराने या धक्क्यातून सावरत अभ्यासाकडे लक्ष देत दहावीची परिक्षा दिली. नुकताच या परिक्षेचा निकाल लागला असून स्वराने पैकीच्या पैकी गुण मिळवत आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण केले.
वडीलांचे छत्र हरवल्यानंतर आईचा आधार…
परिक्षेच्या तोंडावर वडीलांचे निधन झाल्याने मोठा धक्का बसला होता.आता आमचे काय होणार या विचाराने जीणे मुश्किल झाले होते.मात्र आईने मोठ्या धाडसाने आलेल्या परिस्थीतीचा सामना करत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.तुला वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचेय असे सांगून ती कायम आधार देत होती.तिच्यामुळेच आज मी वडीलांचे स्वप्न पूर्ण करू शकले असल्याचे भावनिक उदगार कु. स्वरा दिपक टकले यांनी काढले.