औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी विभागातून एक लाख 84 हजार 329 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. चार एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र असल्याशिवाय त्यांना दहावीच्या परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळं त्यांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी दहावीचे पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे.
बोर्डाने जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ही परीक्षा दोन सत्रात पार पडणार आहे. सकाळच्या सत्रात परीक्षा 10:30 ते दुपारी दोनपर्यंत तर दुसऱ्या सत्रात दुपारी तीन ते सायंकाळी 5:15 वाजता परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा घेताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. परीक्षेसाठी यंदा विभागात 626 मुख्य केंद्र; तर 2614 उपकेंद्र निश्चित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाइल फोन, टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटसचा वापर करण्यास मनाई आहे.
एकूण केंद्र – 626
उपकेंद्र – 2614
परीक्षक – 63
विद्यार्थी – 1,84,329