परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जिल्ह्यातील मानवत रोड ते परभणी दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग 61 च्या कामासाठी कंत्राटदाराकडून महसूल विभागाच्या परवानगीविना गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची बाब उघड झालीये.जिल्ह्यातील मानवत रोड ते परभणी दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बोगस व दिरंगाईने होणाऱ्या कामाची जिल्ह्यात चर्चा आहे. त्यात आता रस्ता कामासाठी लागणारा दगड उत्खनन होत असताना महसूल विभागाची परवानगी न घेताच या कामासाठी शेकडो ब्रास
गौण खनिजाची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारातील गट क्रमांक 114 मध्ये हे उत्खनन चालू आहे. येथून जवळच एक किमीच्या अंतरावर मानवत तालुक्यात बसवण्यात आलेल्या स्टोन क्रेशर मध्ये येथे उत्खनन करण्यात आलेला दगड याची रस्त्यासाठी लागणारी गिट्टी करण्यात येत आहे. यासाठी आम्ही शासनाकडे रॉयल्टी भरल्याचे कंपनीचे एक कर्मचारी अमोल पामटेवार सांगतात. राष्ट्रीय महामार्ग चे काम असल्याने परवानगीचे कारण देत काम थांबवता येत नाही असेही ते सांगतात. दरम्यान गट क्रमांक 114 चे मालक प्रल्हाद दहे यांनी पाथरी तहसीलदार यांच्याकडे उत्खननासाठी परवानगी मागितलेली आहे.
विशेष म्हणजे या कामासाठी संबंधितांनी परवानगी अर्ज केल्यानंतर रॉयल्टी चालन व उत्खननाची ठिकाणी महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला असला तरी 31 ऑगस्ट रोजी उत्खनन होत असलेल्या ठिकाणच्या शेजारी गट क्रं. 115,116,117 मधील जमीनधारक असलेल्या शेतकऱ्यांने संबंधित ब्लास्टिंग कामाला लेखी स्वरूपात आक्षेप अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे पाथरी तहसीलदार यांच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. असे पाथरीचे प्रभारी तहसीलदार एस.बी. कट्टे सांगतात. दरम्यान च्या काळामध्ये परवानगी नसलेल्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 61 चे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीने मशिनच्या साह्याने ब्लास्टिंग करत शेकडो ब्रास दगडाचे उत्खनन केले आहे. जे अवैध आहे.ब्लास्टिंग ने उडालेले दगड शेजारील शेतात पडत असुन त्यामुळे शेतपिकांच नुकसान होत आहे. असं स्थानिक शेतकऱ्यांच म्हणने आहे. अवैध दगड उत्खनन बाब पाथरीचे प्रभारी तहसीलदार यांना माहिती असूनही त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी कारवाई केलेली दिसत नाही .त्यामुळे त्यांचा उत्खननास मूक पाठिंबा असल्याचे दिसून येते. अवैध उत्खनन होत असलेल्या ठिकाणी व स्टोन क्रशरवर कंपनीने तीन मोठे पोकलेन, जनरेटर, सहा ते सात हायवा ट्रक , ड्रिल मशिन चा ताफा नेत महसुल बुडवत गौण खनिज चोरले असुनही स्थानिक प्रशासनाकडून . कारवाई होत नसल्याने आता जिल्हाधिकारी या प्रकरणी लक्ष देत कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झालायं.