औरंगाबाद : लस न घेताच प्रमाणपत्र घेण्याचा काहीजणांचा प्रयत्न असतो. लस न घेताच एकाच कुटुंबातील 16 जणांची नावे वेबसाईटमध्ये आढळून आली. डी के एम एम लसीकरण केंद्रात हा प्रकार घडला. डाटा ऑपरेटर च्या सतर्कतेमुळे हे सर्व प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मनपाने चौकशी सुरू केली आहे. या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी याप्रकरणी तक्रार दिल्याची माहिती डॉ. पारस मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
शनिवारी शहरात 56 केंद्रावर लसीकरण सुरू होते. नेहमीप्रमाणे डीकेएमएम महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. पहिल्या टप्प्यात 55 टोकन वाटण्यात आले होते. टोकन दिलेल्या प्रत्येक व्यक्तींची नोंदणी रजिस्टरमध्ये करून त्यानंतर आमच्या कोविन ॲपमध्ये त्याची नोंद घेतली जात होती. 55 जनाचे लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदणी बरोबर झाल्या की नाही हे पाहण्यासाठी तपासणी केली तेव्हा त्यांना 71 जणांनी लस घेतल्याचे दिसून आले.
त्यांनी ही माहिती टास्क फोर्सचे तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली. त्यांनी तात्काळ लसीकरण थांबवले. ही माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा डॉ. नीता पाडळकर यांना अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने यांनी दिली. केवळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही लोकांनी ॲपचा पासवर्ड हॅक केल्याची शंका ऑपरेटरने व्यक्त केली आहे. याबाबत बेगमपुरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.