कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या सत्ताधारी संचालक मंडळाने गेल्या ५ वर्षात सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची व धोरणांची सविस्तर माहिती देणारी ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ५ वर्षातील विकासकार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन राजारामबापू दूध संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हादराव पवार यांच्या हस्ते व ज्येष्ठ सभासद शेतकरी दिनकरराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
ही कार्यअहवाल पुस्तिका कृष्णा कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांपर्यंत लवकरच पोहचविली जाणार आहे. कृष्णा कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, संजय पाटील, निवासराव थोरात, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, गिरीश पाटील, सुजीत मोरे, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना व्हाईस चेअरमन जगताप म्हणाले, की गेल्या ५ वर्षांपूर्वी कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनेल सत्तेवर आले. तेव्हापासून आजपर्यंत चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले आमचे संचालक मंडळ शेतकरी सभासदांच्या हितासाठी अविरतपणे काम करत आहे. गेल्या ५ वर्षात आमच्या कार्यकाळात कारखान्यात आलेल्या आर्थिक शिस्तीमुळे आज कारखाना सुस्थितीत आहे. पारदर्शक कारभार करत, सभासदांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आज कृष्णा कारखाना महाराष्ट्रात सहकारात पुन्हा नावाजला जात आहे. या गेल्या ५ वर्षातील विकासकार्याचा संपूर्ण लेखाजोखा सोप्या भाषेत ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ या पुस्तिकेत मांडण्यात आला आहे. ही पुस्तिका लवकरच सर्व सभासदांपर्यंत पोहचविली जाणार असून, कृष्णा कारखान्याची विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारीची जाणीव ही पुस्तिका वाचल्यानंतर सभासदांना नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देसाई म्हणाले, की गेल्या ५ वर्षात डॉ. सुरेशबाबांनी उत्कृष्टपणे कारखाना चालवित सभासदांच्या भल्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या सर्व कार्यकाळाचा सविस्तर पट या पुस्तिकेत मांडण्यात आला असून, सभासदांनी या पुस्तिकेचे जरूर अवलोकन करावे. कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी सभासदांनी पुन्हा एकदा सहकार पॅनेललाच विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवाजीराव थोरात यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम जाधव यांनी आभार मानले. यावेळी बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, ज्येष्ठ सभासद पांडुरंग देशमुख, पैलवान वसंतराव कदम, महेश जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा