सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अवकाळी पावसाचा फटका साताऱ्यात चांगलाच बसलेला आहे. या पावसामुळे वाई तालुक्यात शेळ्या तर खटाव तालुक्यात मेंढ्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत. तर सातारा शहरातील ऐतिहासिक मंगळवार तळ्यात मृत माशांचा खच पडला आहे. मात्र याबाबत दूषित पाणी आणि अवकाळी पाऊस याचा परिणामामुळे मृत पडल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सातारा शहरातील ऐतिहासिक मंगळवार तळ्यात मृत मासे बाहेर काढणे सुरू आहे. एकाचवेळी शेकडो मासे मृत पडल्याने स्थानिक लोकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. या माशांच्या मृत पडण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत प्रशासनाकडून कारण शोधले जाणार का हाही प्रश्न आहे. मात्र माशांच्या मृत्यूचे कारण हे दूषित पाणी आणि अवकाळी पाऊस असल्याची शक्यता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे.
मंगळवार तळ्यातील मासे मृत्यूमुखी पडल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच तळ्यातील मृत मासे बाहेर काढल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली नाही. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्याने माशांचे खरे कारण समजणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांच्यातून व्यक्त केले जात आहे.