हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सध्या IPL सामने सुरु असून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने स्टेडियम मध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटत आहेत. याच दरम्यान या स्पर्धेला काळिमा फासणारी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. IPL मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिल्ली कपिटल्स (Delhi Capitals) संघातील खेळाडूंच्या महागड्या वस्तू चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली आहे . दिल्लीचा संघ बेंगळुरूहून दिल्लीला परतत होता. त्या दरम्यान, खेळाडूंचे सामान चोरीला गेले.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये दिल्लीचा कपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि विकेटकिपर फलंदाज फिल सॉल्टच्या किटमधून प्रत्येकी तीन बॅट गायब झाल्या आहेत. तर अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या दोन बॅट्स चोरटयांनी गायब केल्या आहेत. युवा खेळाडू यश धुलच्या पाच बॅट सुद्धा चोरीला गेल्या आहेत. सामन्याच्या दुसर्या दिवशी जेव्हा खेळाडूंचे सामान त्यांच्या हॉटेलच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. जवळपास १६ बॅट चोरीला गेल्या आहेत. यातील प्रत्येक बॅटची किंमत अंदाजे एक लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय अनेक खेळाडूंचे बूट आणि हातमोजेही चोरीला गेले आहेत.
दरम्यान, यंदाची आयपीएल दिल्ली कॅपिटल्स साठी खराब स्वप्नासारखी ठरली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने आत्तापर्यंत सर्वच्या सर्व पाचही सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांच स्पर्धेतील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. आत्तापर्यन्त डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू अक्षर पटेल वगळता इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर दिल्लीच्या संघाला इथून पुढे सर्व सामने जिंकावे लागतील.