वॉशिंग्टन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावे आलेल्या टपालात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने ही स्फोटके हुडकून काढली आहेत.
ओबामा यांना बुधवारी तर क्लिंटन यांना हे टपाल मंगळवारी आले होते. या दोन्ही नेत्यांना गुप्तचर संस्थेचे संरक्षण उपलब्ध असून त्यांच्या टपालाचा प्रत्यक्ष बटवडा करण्यापूर्वी नियमितपणे स्कॅनिंग केले जाते. तशाच स्कॅनिंगमध्ये ही संशयास्पद पाकिटे मिळाल्याने साहजिकच ती या दोघांपर्यंत पोहोचून होणारा संभाव्य धोका टळला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची परीक्षा म्हणून पाहिली जाणारी अमेरिकी काँग्रेसची मध्यावधी निवडणूक येत्या ६ नोव्हेंबरला व्हायची आहे. त्याचा या संभाव्य स्फोटक टपालाशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.