हिंगोली | महाराष्ट्रामध्ये दहा तर उत्तर प्रदेशात नोकरीसाठी आरोपीने तरुणांकडून पाच लाख उकळणाऱ्याला हिंगोली पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींकडून आता हळूहळू माहिती समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीला लावण्यासाठी ५ ते १० लाख रुपये, त्याचबरोबर उत्तर प्रदेशात ८० हजार ते ५ लाख रुपये उकळले जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यामध्ये एक मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत पोलिसांनी देशभरात तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अभय रेडकर (दिल्ली), संतोषकुमार सरोज (उत्तर प्रदेश), गौतम फणसे (ठाणे) यांची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये गौतम फणसे याने मुंबई महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लावतो असे सांगत फसवणूक केल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे. आता पर्यंत तब्बल २१ जणांना फसवल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून महाराष्ट्रातील आणखी किती तरुणांना फसवले याची माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर दुसरा आरोपी संतोषकुमार सरोज हा उत्तर प्रदेश आणि दिल्ली भागात पांडे हे आडनाव लावून राहत होता. तो सरोज या आडनावापेक्षा पांडे या आडनावानेच प्रसिद्ध असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. मुंबई व इतर भागामध्ये घर मिळवण्यासाठी तो नाव आणि आडनाव बदलून राहत असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील तरुणांना हेरण्यासाठी त्यांचे स्थानिक पातळीवर एजंट होते. या एजंटच्या माध्यमातून ते तरुणांची फसवणूक करीत होते. महाराष्ट्रातील तरुणाकडून नोकरीला लावण्यासाठी रक्कम घेतल्यानंतर त्यातील काही रक्कम स्थानिक एजंट स्वतःसाठी काढून घेऊन पुढे देत होता. याप्रमाणे किमान तीन ते चार टप्पे असून प्रत्येक जण आपापला हिस्सा काढून घेत होता. शेवटच्या टप्यावरील व्यक्तीकडे दोन ते तीन लाख रुपये पोहोचत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी मुख्य आरोपीचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पथके स्थापन केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या पथकाकडून या आरोपींची चौकशी सुरू आहे.