औरंगाबाद । रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्तीचे आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन औरंगाबाद सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांना मेलद्वारे देण्यात आले.
निवेदनात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक भागात स्थानिक प्रशासनाने लोकडाऊनची घोषणा केली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी, आवेदन पत्र भरण्याची सोय उपलब्ध न झाल्याने आवेदन पत्र भरता आले नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे लक्ष वेधण्यात आले. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यास तातडीने मुदतवाढ द्यावी व जोपर्यंत जनजीवन पूर्ववत होत नाही तोपर्यंत शिष्यवृत्ती आवेदनपत्र स्वीकारावे, अशी मागणी करण्यात आली.
भारत सरकार शिष्यवृत्ती ही गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्यभूत ठरत असल्याने एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहता कामा नये. याची दक्षता घ्यावी, अशी विंनती ही या मेलद्वारे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनावर सचिन निकम, अॅड. अतुल कांबळे, प्रा. प्रबोधन बनसोडे, इंजि. अविनाश कांबळे, सागर ठाकूर, गुरू कांबळे, महेंद्र तांबे, सागर प्रधान, प्रकाश उजगरे, कुणाल भालेराव आदींची नावे आहेत.