अमेरिकेचे महाशस्त्र F-35 फायटर जेट भारताच्या लष्कर ताफ्यात येणार; शत्रूराष्ट्रांना घाम फुटणार

0
2
F-35 fighter jets
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी संरक्षण आणि व्यापाराच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताला अत्याधुनिक F-35 स्टेल्थ फायटर जेट (F-35 fighter Jets) देण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती दिली आहे. यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. तसेच, यामुळे चीन (Chine) आणि पाकिस्तानसारख्या (Pakistan) शत्रूराष्ट्रांवर देखील याचा मोठा प्रभाव पडू शकतो.

ओवल ऑफिसमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यासह संरक्षण करारांव्यतिरिक्त व्यापार क्षेत्रातही मोठे निर्णय घेण्यात आले. अमेरिकेने अलीकडे आपल्या उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी आयात शुल्क वाढवले आहे, ज्याचा परिणाम मेक्सिको, कॅनडा आणि चीन यांच्यावर झाला आहे. त्यामुळे भारतालाही अशा धोरणाचा सामना करावा लागू शकतो, याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या बैठकीत भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली.

दरम्यान, F-35 हे सर्वात शक्तिशाली स्टेल्थ फायटर जेट आहे, त्याची खासियत म्हणजे हे जेट रडारला सहज सापडत नाही आणि अचूक निशाण्यासह हल्ला करण्याची क्षमता राखते. चीनने अलीकडेच फायटर जेट विकसित केल्याचे समोर आले होते, तसेच, आता पाकिस्तानलाही फायटर विमाने मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताकडे F-35 असणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

महत्वाचे म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. ते म्हणाले की, “यावर्षी आम्ही भारताला काही अब्ज डॉलर्सच्या लष्करी उपकरणांची विक्री वाढवणार आहोत. तसेच, आता भारताला F-35 फायटर जेट देण्याचा मार्गही मोकळा करत आहोत.” या निर्णयामुळेच भारताच्या संरक्षण क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. तसेच, मोदींच्या या दौऱ्यामुळे अमेरिका-भारत संबंध अधिक मजबूत होतील.