नाशिक प्रतिनिधी । भिकन शेख
आजकाल तरुण पिढी फेसबुकच्या आभासी दुनियेच्या माध्यमातून मैत्रीची नवी नाती जोडू पाहतात तर काहीजण दूर गेलेला मित्रवर्गाच्या संपर्कांत राहू पाहतात. यातून काहींना फेसबुकच्या माध्यमातून जिवलग मित्र मिळतात. तर काहींना आपले असलेले मित्र फेसबुकच्या माध्यमातून टिकवता येतात. मात्र, आता फेसबुक केवळ मैत्रीपुरतं मर्यादित राहील नाही आहे. फेसबुकच्या माध्यमातून रक्ताची नसतील पण मायेच्या आणि स्नेहातून एकत्र भेटलेल्या भिन्न व्यक्तींमध्ये आता जिवाभावाची नाती तयार व्हायला लागली आहेत. अशाच एका बहीण-भावाच्या नात्याची कहाणी आपण पाहणार आहोत.
नाशिक-म्हसरूळचे रहिवाशी ज्ञानेश्वर जाधव-देशमुख आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरपासून २५ कि.मी.अंतरावरअसलेल्या माळशिरस तालुक्यातील ‘तांदुळवाडी’ गावच्या रहिवाशी सौ.धनश्री रविकिरण कदम. यांची एकमेकांची ओळख नाही की कुठलेही नातेसंबध नाही. पण चार वर्षांपूर्वी मोबाईल-फेसबुकवर ओळख झाली ती फक्त भाऊ-बहिण या नात्याचा आधार घेऊनच. तेच नातं सतत चार वर्षे फक्त फेसबुकवर टिकतांना मात्र या दोघाचं नात म्हणजे यंदाच्या दिवाळीत पणती पौर्णिमा दिनी श्रीक्षेत्र पंढरपूर नगरीत समोरासमोर येऊन अधिक स्नेहमय झालं .आणि खऱ्या अर्थाने गेल्या चार वर्षांपूर्वीच फक्त फेसबुकवरील भावा-बहिणीचं नात्यातील या दोघांच्या आयुष्यातील ‘भाऊबीज’ तब्बल वीस वर्षानंतर साजरी झाली. अन् जन्मापासूनच बहिण नसलेल्या ज्ञानेश्वर जाधव यांचा मागील वीस वर्षाचा काळ भरून निघाला.आज त्यांचा आनंद गगनात मावेना हे विशेष..!
ज्ञानेश्वर जाधव यांना रक्ताच्या नात्याची बहीण नाही. त्यामुळे त्यांना बहिणीची उणीव नेहमी भासत होती. आजही समाजात फेसबुक, सोशल मीडिया बद्दल गैरसमज असले तरीही ज्ञानेश्वर जाधव व धनश्री कदम या ‘फेसबुकवरील बहीण- भावांना’ याचा चांगला अनुभव आला. कारण दिवाळी निमित्त शालेय मुलांना सुट्टी म्हणून जाधव परिवार महाराष्ट्र-देवदर्शन करीत असतांना श्री क्षेत्र पंढरपूर नगरीत पोहचले. त्याच ठिकाणी साक्षात ‘विठ्ठल-रूखमिणी’ च्या दारात ज्ञानेश्वर जाधव व धनश्री कदम यांची पणती पौर्णिमा दिनी समक्ष भेटण्याचा निर्णय झाला. आणि दुपारी त्यांची समक्ष भेट झाली. त्यावेळेस दोघांनाही खूप आनंद होतांना. खऱ्या अर्थाने विठू-माऊलीने या फेसबुकवरील बहीण-भावाची भेट समक्षच घडविली हे देखील एक दैवी शक्तीच म्हणायची..! असे जाधव यांनी व्यक्त केले.
हा योगायोग यापुढे ते कधीही विसरणार नाहीत. सतत गेल्या काही वर्षांच्या फेसबुकवरील भेटीनंतर चक्क असे वाटते कि,त्यांचे चार जन्माचे भाऊ-बहीण रक्ताचे नाते होते काय? श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये योगायोगाने ऐन दिवाळीत जाधव परिवार महाराष्ट्र-देवदर्शनाला गेलेत अन् पंढरपूर नगरित पोहचले तेंव्हा कदम ताईंना- जाधव भाऊंनी फोन केला. दरम्यान कदम ताईंनी जाधव भाऊंना भेटण्यास तात्काळ पंढरपूर गाठले व जाधव परिवारासाठी विठू-माऊली दर्शनासह रहाण्यास चांगली रूम, जेवण अशी सर्वतोपरी व्यवस्था करून दिली. ती कदम ताईंनी स्वत:च्या खर्चाने ! त्याच दिवशी ‘दिवाळी-पणती पौर्णिमा’चा योग असल्यामुळे त्याच दिवशी ‘भाऊबीज’ करण्यात आली. पंढरपूरात ‘विठू-माऊली’ च्या साक्षीने त्यांच्या दारात भाऊबीज साजरी केली आणि भावा बहिणीचे नाते अधिकच घट्ट झाले. त्याप्रसंगी प्रामुख्याने कदम ताईंनी तिचे आशीर्वाद म्हणून जाधव भाऊंना ‘विठ्ठल- रुख्मिणी’ ची मूर्ती भेट दिली. तो आनंद जाधव परिवारात गगनात मावेनासा झाला होता. त्या क्षणी ज्ञानेश्वर जाधव यांना त्याच दिवसापासून हक्काची बहिण मिळाल्याचा आनंद मार्ग मोकळा झाला. आईनंतर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती बहीण.
म्हणून बहीण भावाच्या दाराकडे डोळे लावून बसते रक्षाबंधन भाऊबीज दिवस राखून ठेवा आईच्या माघारी बहीणच आई असते देवा. याप्रमाणे जाधव यांना बहिण मिळाली. ती इतरांनाही मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.