नवी दिल्ली । संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अनेक देश ठप्प आहेत. असंख्य लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारत सुद्धा कोरोनाशी झगडत आहे. तर आपला शेजारी पाकिस्तानला सुद्धा कोरोनाने घेरलं आहे. दरम्यान, संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना पाकिस्तान मात्र कपटी कट रचण्यात मश्गुल आहे. भारत सरकारने कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी लॉन्च केलेल्या Aarogya Setu अॅपशी साम्य असलेल्या, फेक आरोग्य सेतू अॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा भारतीय जवानांचे फोन हॅक करण्याचा कट रचत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सुरक्षा एजन्सींनी इशारा दिला असून लष्करी जवानांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा एजन्सींकडून एका पाकिस्तानी फेक मोबाइल अॅपबाबत सतर्क राहण्याचा इशारा जवानांना देण्यात आला आहे. पाकिस्तान फेक अॅपद्वारे तुमच्या फोनमधून संवेदनशील डेटा चोरी करण्याचा प्रयत्न असू शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी सैन्यदल आणि निमलष्करी दलाच्या जवानांना दिला. व्हॉट्सअॅप, एसएमएस, इ-मेल किंवा इंटरनेट आधारित सोशल मीडियाच्या एखाद्या लिंकद्वारे हे अॅप युजर्सच्या फोनमध्ये पोहोचू शकते. त्यामुळे जवानांनी केवळ अधिकृत वेबसाइट mygov.in यावरुनच आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
असा केला जाऊ शकतो जवानांचा फोन हॅक
फेक आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करताना अतिरिक्त अॅप्लीकेशन पॅकेज इंस्टॉल करण्याची परवानगी मागितली जाते. सुरक्षा एजन्सींनी सांगितले की, एकदा परवानगी दिल्यानंतर सर्व्हरद्वारे फोनमध्ये फेस डॉट एपीके, आयएमओ डॉट एपीके, नॉर्मल डॉट एपीके, ट्रूसी डॉट एपीके, स्नॅप डॉट एपीके आणि व्हायबर डॉट एपीके यांचा शिरकाव होतो. या सर्व व्हायरसमुळे हॅकरला युजर्सच्या मोबाइलमधील सर्व माहिती मिळते आणि युजरच्या अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवता येते. चोरलेला सर्व डेटा कंट्रोल सर्व्हरला पाठवला जातो. हे कंट्रोल सर्व्हर नेदरलँड्समध्ये असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे सैनिकांनी आपल्या मोबाइल फोनवर सोशल मीडिया आणि ई-मेलवर संशयास्पद लिंक ओपन करताना खबरदारी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तसेच फोनमध्ये अँटी व्हायरस देखील इंस्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.