पुणे । शिवप्रेमींच्या तीव्र भावना लक्षात घेऊन साबळे वाघिरे आणि कंपनीनं आपल्या उत्पादनाचं ‘संभाजी बिडी’ हे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसं पत्रकच कंपनीनं प्रसिद्धिस दिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी बिडीचं नाव बदलण्यावरूनचा वाद सुरू होता. पुन्हा ऐरणीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडीचं नाव ठेवल्यानं त्यांचा अपमान होत असल्याचा मुद्दा शिवप्रेमींनी उचलुन धरला होता. अखेर हा विषय कायमचा निकाली लागला आहे.
साबळे वाघिरे आणि कंपनीनं आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याचं निश्चित केलं आहे. सर्व संघटनांच्या व जनतेच्या भावनांचा आदर करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबतची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास काही दिवस लागतील याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असं आवाहनही कंपनीनं केलं आहे. ‘विडी व्यवसाय हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. संभाजी महाराजांच्या आदरापोटीच आमच्या वडिलांनी या उत्पादनला त्यांचे नाव दिले होते. त्यामागे अवमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता.
२०११ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या मागणीनुसार आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो व छत्रपती हा शब्द पॅकेटवरून हटवला होता. आताही आमची भूमिका सकारात्मक आहे. आमच्या व्यवसायावर ६० ते ७० हजार कामगारांचा प्रंपच सुरू आहे. यात प्रामुख्यानं महिलांचा समावेश आहे. आम्ही तडकाफडकी नाव बदलले तर आमच्या व्यवसायाची साखळी तुटेल. हा व्यवसाय बंद पडला तर हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळं सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती कंपनीच्या प्रमुखांनी केली आहे.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संभाजी महाराजांचं नाव एका विडीला देण्यावरून शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. यापूर्वीही याबाबतच्या चर्चेला अनेकदा तोंड फुटलं होतं. मात्र, यावेळी संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी हा विषय लावून धरला होता. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलनही सुरू केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदाररोहित पवार यांनीही सोशल मीडियातून विषयी आवाज उठवला होता. लोकभावनेचा आदर करून कंपनीनं याबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यांना भाजपचे आमदार नीतेश राणे यांचीही साथ मिळाली होती. नीतेश यांनी थेट ‘धूर काढण्याची’ भाषा केली होती. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.