हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी शुक्रवारी मुंबईच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून इमरोज हे आजारी होते. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले. मात्र आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. सध्या इमरोज यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग असे होते. ते एक उत्तम कवी आणि सुप्रसिद्ध चित्रकार देखील होते. परंतु त्यांना खरी लोकप्रियता ही प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांच्यामुळे मिळाली. अमृता आणि इमरोज एकमेकांवर प्रेम करत तब्बल 40 वर्ष एकत्र राहिले. अमृता प्रीतम यांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये इमरोज यांनी साथ दिली. मात्र 31 ऑक्टोबर 2005 रोजी अमृता यांचे निधन झाले. खरे तर तेव्हापासून इमरोज एकटे पडले.
अमृता प्रीतम यांनी आपल्या शेवटच्या काळात इमरोज यांच्यावर एक कविता लिहिली होती. त्या कवितेच्या काही ओळी अशा होत्या की..,
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी..
तर इमरोज यांनी देखील अमृता यांच्याविषयी अनेक कविता लिहल्या. यातील एका कवितेची सुरुवात ‘उसने जिस्म छोड़ा है, साथ नहीं…’ अशी होती. इमरोज यांचा जन्म लाहोरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावामध्ये झाला होता. अमृता आणि इमरोज यांची ओळख पुस्तकाच्या एका कामानिमित्त झाली होती. पुढे जाऊन त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की ते तब्बल 40 वर्ष लग्न न करता एकत्र राहिले. मधल्या काळात अमृता यांनी हे जग सोडल्यानंतर इमरोज अज्ञाताचे जीवन जगत होते. त्यांनी जास्त बाहेर येणे जाणे लोकांना भेटणे देखील बंद केले होते. या मधल्या काळातच इमरोज यांची प्रकृती बिघडत गेली. अखेर आज त्यांचे निधन झाले. इमरोज यांच्या निधनाच्या बातमीमुळे साहित्य विश्वासह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.