सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कवठेमहांकाळ तालुक्यातील पैसे भरूनही शिरढोण व तिरमलवाडी येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरले नाहीत. याचा उद्रेक होवून म्हैशाळ योजनेचे पाणी मिळावे या प्रमुख मागणी करिता पुकारलेले रास्ता रोको आंदोलन सुरू होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाणी सोडल्याने व बंधारे भरून देण्याचे लेखी पत्र म्हैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने शिरढोण येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
शिरढोण, तिरमलवाडी व कवठेमहांकाळ येथील नरघोल पाटील वस्ती भागातील शेतकर्यानी हुलवान वस्ती नजिक बंधारा व तिरमलवाडी येथील बंधारा म्हैशाळ योजनेच्या पाण्याने भरून घेण्यात यावा व या मागणीसाठी सकाळी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्याचा इषारा शेतकरी संघटना व तिन्हीही गावातील शेतकर्यानी निवेदनाद्वारे दिला होता. शनिवारी मिरज पंढरपूर राज्य मार्गावर शिरढोण येथे जनावरांसह बेमुदत रस्तारोको आंदोलन होते.
सकाळी बस स्थानका समोरच्या पटांगणावर एक सभा घेतली. यावेळी सभास्थानी येऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले. तातडीने मुख्य कँनालवरील दोन दरवाजे उघडले व पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने, तालुकाध्यक्ष नंदकुमार पाटील, आंदोलनाचे संयोजक व्ही. वाय. पाटील , आर. पी.आय.तालुका अध्यक्ष पिंटू माने , विजय कांबळे, अशोक पाटील, किसान सभेचे दिगंबर कांबळे, माणिक पाटील सर, जयवंत पाटील आदीसह परिसरातील शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यासह उपस्थित होते.