कराड | हेळगाव (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व शेतकरी सुनील शंकरराव पाटील यांचा शेतात पाणी पाजताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे चुलते किसन पाटील हेही शॉक लागून किरकोळ जखमी झाले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ही घटना घडली असून यातून तीनजण सुदैवाने बचावले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हेळगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हे आपल्या शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात असणाऱ्या खांबावरील विजेची तार विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारेवर तुटून पडल्याने शेतातील पाण्यात वीज प्रवाह चालू झाला. त्यामुळे सुनील पाटील हे पाणी पाजत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का लागून ते जागीच मृत्युमुखी पडले. त्यांना शोधण्यासाठी गेलेले त्यांचे चुलते किसन गणपती पाटील यांंनाही विजेचा शॉक लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर यांच्या पत्नी नंदा पाटील व चुलत बंधू अनिल पाटील यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने दोघेजण या घटनेतून बचावले आहेत. सदर घटनेची फिर्याद मसूर पोलिसात देण्यात आली आहे.
दरम्यान सुनील पाटील हेळगावसह परिसरातील एक सोज्वळ व हसतमुख व्यक्तिमत्त्व होते. ते भाऊ या नावाने परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अखेर त्या तारेनेच घेतला बळी… तर घटना घडलीच नसती…
सुनील पाटील यांच्या शेतात उभ्या असलेल्या खांबावरून रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या खांबावर बिन कामाची एक विजेची तार बऱ्याच दिवसापासून ठेवण्यात आली होती. सदरील तार काढण्याबाबत सुनील पाटील यांनी वीज वितरण कंपनीला तोंडी व लेखी कळवले होते. मात्र वीज वितरण कंपनीने कोणतीही दखल न घेतल्याने त्याचा नाहक फटका पाटील कुटुंबीयांना बसला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पाटील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा सर्वत्र निषेध होत आहे.