कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात ऊसदर जाहीर होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. दोन दिवसापूर्वी एक ट्रॅक्टर पेटविला होता, कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती. आता सह्याद्री साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या वाहनांची हवा अज्ञातांनी सोडली आहे. त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळू लागला आहे. या प्रकारामुळे ऊस दराचे आंदोलन आता चिघळू लागले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवस ऊस तोड व वाहतूक बंद आंदोलन पुकारले होते. त्याचवेळी सातारा जिल्ह्यात ऊस दर संघर्ष समितीनेही अनेक बैठका घेवून ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर दर जाहीर झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना देवू नसे, असे आवाहनही अनेकदा केले होते. त्यानंतर आज सकाळी कोपर्डे हवेली येथे रेल्वे फाटकाजवळ अनेक वाहनांची हवा सोडण्यात आली आहे. अनेक वाहनांची अज्ञातांनी हवा सोडल्याने रस्त्यावरच उभी आहेत. तेव्हा आता कारखाने या आंदोलनांची दखल घेवून दर जाहीर करणार की आंदोलन अजून भडकणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी इंदोली येथे जयवंत शुगरकडे जाणारा ट्रॅक्टर पेटविला होता. तर वाठार येथे कृष्णा व राजाराम बापू साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूक रोखली होती. सायंकाळी उशिरा पोलिस बंदोबस्तात अनेक वाहने कारखान्यांकडे रवानाही करण्यात आली होती. आता 25 नोव्हेंबर रोजी स्वाभिमानीने चक्का जाम करण्याचे आवाहनही केले आहे. अशातच आज ऊस दर संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद शेतकऱ्यांनी वाहनांच्या हवा सोडण्यास सुरूवात केली आहे.