कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीतील रेल्वे गेट क्रमांक एल सी 98 या ठिकाणी भुयारी मार्गाच्या कामात पाणी साचत आहे. त्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे रेल्वे पोलीसांना देण्यात आला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारी पार्लेसह परिसरातील शेतकरी ग्रामस्थानी आंदोलन सुरु केले. यावेळी रेल्वेचे उप अभियंता कुमार सक्सेना यांनी आंदोलन स्थळी भेट देत 10 एप्रिल ते 31 मे पर्यंत काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, सरपंच आश्विनी मदने, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव चव्हाण, वडोलीचे निळेश्वरचे सोमनाथ पवार, माजी उपसरपंच दयानंद पवार, अमित पवार, सुनिल पवार, प्रदिप पवार, माजी स्वातंत्र्य सैनिक शंकरराव पवार यांच्यासह पार्ले, वडोली निलेश्वर, कोपर्डे हवेली येथील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन नलवडे म्हणाले की, रेल्वे पुलात साठलेले पाणी काढून देण्याचे काम प्रथम करावे व त्यानंतरच रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. यावेळी कोणता अनुचित प्रकार घडु नये म्हणून रेल्वे पोलीस, तालुका पोलीस उपस्थित होते.