शेतकऱ्यांची कांदा बियाणांसाठी लगभग

onion seed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांची बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ओढाताण सुरु आहे. सध्या कांदा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे उपलब्ध असलेले तीन-चार क्विंटल बियाणे केंव्हाचेच विकून झाले आहे. बाजारपेठेत कांद्याला मिळत असलेले दर तसेच आगामी काळातील भावाचा कल लक्षात घेत शेतकरी कांदा लागवडीच्या तयारीला लागले आहेत. या भागात पांढरा कांदा लागवडीला शेतकऱ्यांची पसंती राहते. कांद्याचे बियाणे सध्या मिळत नसल्याने शेतकरी जागोजागी संपर्क साधत आहेत. लाल कांद्याचे बियाणे कंपन्यांनी उपलब्ध करुन दिलेले आहे. हे बियाणेही महाग झालेले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे यंदा तीन-चार क्विंटल बियाणे उपलब्ध होते. या महिन्यात सुरुवातीलाच हे बियाणे १५०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाले. सध्या विद्यापिठात बियाण्यासाठी सातत्याने चौकशी केली जात आहे. दरवर्षी इतकी मागणी राहत नाही. त्यामुळे बियाण्यासाठी कधी नव्हे एवढी चौकशी यावर्षी शेतकऱ्यांकडून होत असल्याचे विद्यापिठातील सुत्रांनी सांगितले.

वऱ्हाडात अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्हयात कांदा बीजोत्पादन केले जाते. सध्या काही खाजगी कंपन्यांनी बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांसोबत करार सुरु केले आहेत. लागवडीसाठी कांदा २००० रुपये क्विंटल आणि त्यापासून तयार होणारे बियाणे ३५ ते ४० हजार रुपये क्विंटलने खरेदी करण्यात येईल, असे या कराराचे स्वरुप असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात दरवर्षी कांदा लागवड, बीजोत्पादनाचे क्षेत्र विस्तारत आहे. यंदा तर पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांचा कल अधिक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’