लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

धामणेर गावच्या शेतकऱ्यांनी रहिमतपूर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठाबाबत जाब विचारला. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या एक महिन्यापासून धामणेर गावातील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झाले आहे. विजेचा कमी दाबाने वीज पुरवठा होत असून कधी अचानक वीज खंडित होत आहे. भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय.

वीज वितरणच्या या कारभाराबाबत धामणेरच्या शेतकऱ्यांनी रहिमतपूर येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी खंडित होणारा वीजप्रवाह लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्याने तणाव निवळला.

कोरेगाव, रहिमतपूर हा बागायत भाग असून या परिसरात ऊस, सोयाबीन, गहू, हरभरा आणि भाज्यांची पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना वेळेत वीज नसल्याने अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.