कराड | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची धमक असते. घरच्या परिस्थितीमुळे अनेकदा काहीजणांना शालेय जीवणात मोठा संघर्ष करुन शिकावं लागतं. शेतकरी कुटूबांतील मुलं- मुली तर अभ्यासासोबत मैदानी खेळांमध्येही तरबेज असतात. याचाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दानशूर बंडो गोपळा कदम उर्फ मुकादम तात्या विद्यालयात आला आहे. पायात शूज नसल्याने अनवानी धावून अनुष्का पाटील या विद्यार्थिनीनं सुवर्णपदक मिळवलं आहे.
यावर्षी झालेल्या शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये अनुष्का अमृत पाटील या विद्यार्थ्यांनीने सुवर्ण पदक पटकावले आहे. जिल्हास्तरावर झालेल्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये याच विद्यार्थिनीने कांस्य पदक पटकावले होते. विशेष म्हणजे ही विद्यार्थिनी ग्रामीण भागातील असून तिला शूजसह पळण्याचा सराव नसल्याने इतर 200 विद्यार्थिनींमध्ये ती अनवाणी धावली होती. अनवाणी पायानं धावून सुवर्णपदक मिळवल्यानं तिचं जिल्ह्याभरात कौतुक होत आहे.
यावर्षी कराड अर्बन स्पोर्ट्स क्लब तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. क्रीडा शिक्षक श्री. जोशी सर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य अधिकराव पाटील-भाऊ, प्राचार्य श्री. कांबळे सर, पर्यवेक्षक श्री. पतंगे सर व इतर सर्व शिक्षक वृंद यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.