पुसेसावळी परिसरात रानगव्याचे दर्शन; शेतकरी वर्गात घबराट

Ranagava Pusesawali News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी हद्दीतील वंजारवाडी येथील शेतशिवारात आज पहाटेच्या सुमारास दुध संकलनासाठी गेलेल्या शेतकरी अनिल देशमाने यांना रानगव्याचे दर्शन झाले. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात रानगव्याचा व्हिडीओ चित्रीकरण केला. या परिसरात रानगव्याच्या दर्शनाने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

रानगवा हा भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतो. रानगव्याचे दुष्काळी पट्ट्यातील ग्रामीण भागात शेत शिवारात दर्शन होणे दुर्मिळ असल्याने हा सध्या कुतूहलाचा विषय बनला आहे. रानगवा हा वजनदार व भूचर प्राणी आहे.

शाकाहारी प्राणी असल्याने शेतातील पिकांचे नुकसान त्याच्याकडून होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे 1000 ते 1300 किलो पर्यंत वजन असलेल्या या नर जातीच्या रानगव्याचे दर्शन याआधीही गिरिजा शंकरवाडी येथे शेतकऱ्यांना झाले आहे. तर आता हा रानगवा पुसेसावळी परिसरात आढळून आला आहे. रानगवा शक्यतो कळपाने राहतो. त्यामुळे या परिसरात अजून रानगवे आहेत काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पुसेसावळी येथील शेत शिवारात रानगव्याच्या वावराने शेतातील पिकांचे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे वनविभागाने तत्परतेने याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.