सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शेतमालाला चांगला उठाव होऊन त्याला चांगला दरही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या रब्बी हंगामातील कांदा आपल्या शेतातच क्वारंटाईन करून ठेवने पसंद केले आहे . सध्या सगळीकडे रब्बी उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे . सोलापूर जिल्ह्यातील रोपळे येथील शेतकरीही कांदा काढणीत व्यस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोपळे येथील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ या शेतकऱ्याने ही लॉकडाऊन नंतरच कांदा बाजारात विक्रीसाठी काढणार आहेत.
अशा परिस्थीतीत यंदा कांदा पिकाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमिवर त्यामानाने कांदा पिकाला बाजारात उठाव होत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या हातात कांद्यासाठी अपेक्षीत दरही मिळत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कांदा काढणीपश्चात साठवणूकीवर भर दिला आहे. शेताच्या मशागतीपासून ते कांदा साठवणूकीपर्यंत कांद्याला प्रतिक्वींटल सुमारे पाचशे रुपये उत्पादन खर्च झाला आहे.
दरम्यान, बाजारात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्वींटल ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या परिस्थितीत कांदा विकणे परवडत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा साठवून त्याची सावकाश विक्री करण्याचे नियोजन केले आहे. मात्र नैसर्गीक आपत्तीचा सामना करत कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होतोय आणि लॉक डाऊन कधी उठतय यावरच शेतकऱ्यांना कोरंटाईन केलेला कांदा बाहेर काढण्याचे नियोजन करावे लागणार आहे.