सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महावितरणकडून काही दिवसांपूर्वी शेती पंपाची वीज जोडणी तोडली आहे. त्याविरोधात पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करुन वीज जोडणी करण्याची मागणी केली होती. परंतु, या आंदोलनाची दखल न घेता उप अभियंता धर्मे यांनी वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका सुरूच आहे. या विरोधात सुहास पिसाळ यांनी महावितरण कार्यालयासमोर जमिनीत गाडून घेत महावितरणकडून जुलमी पध्दतीने आंदोलन केले.
वीज बिलांची वसुली सुरू आहे, असा आरोप करत ही वसुली व वीज तोडणी थांबवावी, अशी मागणी सुहास पिसाळ यांनी केली होती. मात्र, याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. वीज जोडणी नसल्याने शेतकरी, मजूर यांची अडचण झाली आहे. त्यामुळे पिसाळ यांनी यापूर्वी ठिय्या आंदोलन केले. पण याची दखल न घेता अधिकाऱ्यांनी वीज तोडणी सुरूच केली. या विरोधात सोमवारी पुसेसावळीत मोठा ड्रामा झाला. आंदोलन करूनही अधिकारी दखल येत नसल्याने पिसाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट महावितरण कार्यालयासमोरच जमिनीत गाडून घेत अधिकाऱ्यांचा निषेध केला. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झालेहोते. गाडून घेण्याचा पवित्रा पिसाळ यांनी घेतल्याने परिसरात बघ्यांचीही गर्दी झाली.
या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पिसाळ यांनी वीज जोडणीची मागणी लावून धरली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वीज जोडणी पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. तसेच गावपातळीवर भेट देवून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर शेतकऱ्यांनीही वेळेत बिल भरणार असल्याचे सांगितले. परिसरात तणाव निर्माण झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, आँध पोलिस प्रशासन यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.