कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकऱ्यांची कृषी पंपाच्या वीजबिलांची वसुली मनमानी पध्दतीने न करता मीटरचे रीडिंग घेऊन करावी. शेतीची बिले अन्यायकारकरित्या दिली जात आहेत. सध्या विज न वापर करता बिल भरावे लागत आहे. तेव्हा यामध्ये सुधारणा व्हावी, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रहार स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण यांनी दिला आहे.
ओगलेवाडी येथे महावितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, निखिलेश बद्रायणी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य निवासराव थोरात, सागर शिवदास, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण, सिध्देश्वर विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, शेतकरी भरत चव्हाण, के. बी. चव्हाण, विद्याधर चव्हाण, शरद पाटील, साहेबराव चव्हाण, महेंद्र चव्हाण, नितीन चव्हाण, शिवाजी निकम, मानसिंग तुपे, सिध्दनाथ चव्हाण, अलंकार चव्हाण, बाबुराव चव्हाण, पोपट चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते.
कोपर्डे हवेली गावाची बागायती पट्टा म्हणून ओळख आहे. कृष्णा नदीसह विहिरीवर कृषी पंपाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महावितरण कंपनी वीजबिलांची वसुली कृषी पंपाच्या एच पीनुसार करत असल्याने वीजबिले भरमसाट येत आहेत. त्यासाठी ती पद्धत बंद करून मीटरचे रीडिंग घेऊन वीजबिलाची वसुली करण्यात यावी, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.