अमरावती प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा ‘फास्टॅग’द्वारे भरण्यात यावा असं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता गाडयांना फास्टॅग लावणे अनिवार्य आहे. याची अंमलबजावणी रविवारपासून सुरु करण्यात आली आहे. अमरावती – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथील राष्ट्रीय टोल नाक्यावरून जाण्यासाठी इथून पुढे फास्टॅग लावावा लागणार आहे. मात्र अनेक वाहनांनी हा फास्टॅग लावला नसल्याने नांदगाव पेठच्या टोल नाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
‘स्टॅग’ हा एखाद्या स्टिकरसारखा आहे. कारच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावावा लागतो. या टॅगच्या मार्फत ‘कॅशलेस’ म्हणजे रोख व्यवहार न करता टोल भरण्याकडे लोकांचा कल वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आता नवीन नियमांनुसार हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. संबंधित व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल.
टोलनाक्यांवर लोकांची अडचण होऊ नये, म्हणून सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्याचं ठरवलं आहे. इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन राखीव ठेवली जाईल. १५ डिसेंबर पासून याची अंमलबजावणी चालू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी अमरावती – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठच्या टोल नाक्यावर फास्टॅग लावण्यासाठी मोठ्या रांगा दिसुन आल्या.