हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये सणावारांच्या दिवशी देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी उपवास धरण्याची प्रथा गेल्या अनेक काळापासून चालत आली आहे. परंतु सध्याच्या घडीला वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करण्यावर जास्त कल दिला जात आहे. अशा परिस्थितीमध्येच एका संशोधनातून समोर आले आहे की, इंटरमिटेंट फास्टिंग केल्यामुळे हृदयासंबंधी आजारांमुळे मृत्यू होण्याच्या जोखमीत 91% वाढ झाली आहे. म्हणजेच, दिवसातून फक्त 8 तासांच्या आत जेवण केल्यास हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका वाढू शकतो.
सोमवारी शिकागोमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हणले आहे की, जेवणाची वेळ दररोज फक्त 8 तासांपर्यंत मर्यादित ठेवल्याने हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 91% वाढला आहे. सध्या अमेरिकन हार्ट असोसिएशनने या संशोधनाचा फक्त एक भाग प्रकाशित केला आहे. यातूनच समोर आले आहे की, नवी पिढी वजन कमी करण्यासाठी जेवण न करण्याचा मार्ग निवडत असल्यामुळे याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर होत असल्याचा दिसून येत आहे.
मुख्य म्हणजे, काही डॉक्टरांनी या अभ्यासाच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी असे म्हणले आहे की, संशोधनादरम्यान फास्टिंग केलेल्या लोकांमध्ये आणि इतर गटातील लोकांमध्ये फक्त हृदयाच्या आरोग्यामध्ये फरक असू शकतो. यावरच उत्तर देत प्रोफेसर कीथ फ्रेन यांनी यूके सायन्स मीडिया सेंटरला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका ठराविक वेळेच्या आत जेवण करणे हे कॅलरीजचे प्रमाण कमी करण्याचे उपाय म्हणून लोकप्रिय आहे. आम्हालाही या संशोधनाच्या परिणामांवर दीर्घकालीन अभ्यासाची गरज आहे, परंतु आता प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालातूनही अनेक मुद्दे स्पष्ट होत आहेत.
दरम्यान, शांघाय जिओ टोंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या व्हिक्टर झोऊ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या सुमारे 20,000 प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण केले. तसेच, या अभ्यासात 2003 ते 2019 पर्यंतच्या मृत्यूच्या डेटासह प्रश्नावलीच्या उत्तरांचा विचार करण्यात आला. कारण हा अभ्यास अशा स्वरूपांवर अवलंबून होता, ज्यासाठी रुग्णांनी दोन दिवसांत काय खाल्ले हे लक्षात ठेवणे आवश्यक होते. त्यामुळेच यावर संशोधकांनी म्हणले आहे की, रुग्णांनी किती काळ अधूनमधून उपवास सुरू ठेवला हे स्पष्ट झाले नाही.