Pune-Solapur राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा गुरुवार हा अपघातांचा वार ठरला आहे. कारण, बीड अहमदनगर रस्त्यावर सलग दोन अपघात झाल्यानंतर आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 16 जण जखमी झाले आहेत. ही अपघाताची दुर्घटना आज पहाटे 5 ते 5.30 च्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटसमध्ये घडली आहे. सध्या सर्व जखमी प्रवाशांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे उमरगाहून पुण्याकडे निघालेली खाजगी लक्झरी बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या खाजगी बसचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. या सर्वांना आता पाटस, दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, या अपघातात लक्झरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. तर, ट्रकमध्ये असलेले सिमेंट रस्त्यावर पडल्याने त्याचे ही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवसात धुळे अहमदनगर रस्त्यावर दोन भीषण अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पहिला अपघात हा बुधवारी (दि. 25) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. तर दुसरा अपघात गुरुवारी (दि.26) सकाळी साडेसहा वाजता झाला. या अपघातांमुळे धुळे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. जिला पुन्हा सुरळीत करण्यात आले.