पुणे | पुणे- बंगळूर महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यामुळे चारचाकी गाडी पलटी झाली अन् बापाला जीव गमवावा लागला. पुणे – सातारा महामार्गावर ही घटना घडली आहे. या अपघतात कराड येथील मुजावर काॅलनीतील वसीम इब्राहीम सय्यद (वय- 42 मुजावर कालनी, कराड, जि. सातारा ) असे मृत्यू झालेल्या बापाचे नाव आहे. तर हुजेफा वसीम सय्यद (वय- 15 रा. मुजावर कालनी, कराड, जि. सातारा) असे जखमी मुलाचे नाव आहे. बेशुद्ध वडीलांना वाचविण्यासाठी मुलाचा आटापिटा सुरू होते. मात्र, 15 वर्षाच्या मुलासमोर वडीलांचा मृत्यू झाल्याची ह्रदय पिटळवणारी घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी, वसीम सय्यद हे तीन प्रवांशासह आपल्या 15 वर्षीय हुजेफा मुलाला घेऊन त्यांच्या चारचाकी वाहनाने गावी निघाले होते. पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ (ता. भोर) उड्डाणपुल रस्त्यावर गुरुवारी (दि. 27) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, पुणे –सातारा या महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलावरील पडलेले खड्डे चुकवताना एक दुचाकी अचानक समोर आल्याने झायलो (MH- 14- BX- 4764) या वाहनावरील चालक वसीम सय्यद यांनी दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी ब्रेक दाबला. यामुळे झायलो कारच्या जोरदार तीन पलट्या झाल्या. मोठा आवाज आल्याने शेजारील पंपावरील चालक प्रशांत सुके, मनोज कोंडे व इतर प्रवाशांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. जखमींना सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वसीम सय्यद उपचारापूर्वी मयत झाले.
जखमी वसीम सय्यद यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेत असताना बेशुद्धावस्थेत वसीम यांच्या शेजारी बसलेला हुजेफा वडिलांचे प्राण वाचावे यासाठी अल्लाकडे दुवा करत राहिला. मात्र, दुर्दैवाने वडीलांचा मृत्यू झाला. यावेळी प्रत्यक्षदर्शनी असणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. हुजेफा यांच्यासह गाडीतील जावेद आदिलशाह इनामदार (वय- 36), शैरोनिसा जावेद इनामदार (दोघेही रा. नऱ्हे आंबेगाव), शाहरुख शरीफ मुजावर (वय-30 रा. हिरवडे, ता. करवीर, कोल्हापूर ) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.