तासगाव तालुक्यातील आरवडे येथील अमित वाघ हे आपल्या लहान मुलास पोहायला शिकवत असताना बलगवडे येथील विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अमित हे सकाळी नातेवाईकांसह बलगवडे -आरवडे रोडलगत कापूर ओढ्याकाठी असणाऱ्या विहिरीत लहान मुलास पोहायला शिकविण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानकपणे ते विहिरीत पडले. विहिरीत ४० ते ५० फूट पाणी असल्यामुळे ते खोल तळाशी गेले. त्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी तेथे असणाऱ्या नातेवाईकांनी प्रयत्न केले. परंतु खोल पाण्यात ते सापडले नाहीत.
ही घटना समजताच आरवडे व बलगवडे गावातील काही तरुणांनी विहिरीत उडया मारल्या मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. खोल पाण्यात गाळामध्ये रुतल्यामुळे अमित यांना वर काढणे शक्य झाले नाही. त्यानंतर सांगली येथील जीवरक्षक टीमला फोन करून बोलावण्यात आले व त्या जीवरक्षक टीमने दुपारी अडीच वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यांच्या पच्यात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान घटना घडलेली माहिती होईल तशी घटनास्थळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी होती.या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.