हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताचे महान कृषी वैज्ञानिक आणि हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याचा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. हरित क्रांतीचे जनक म्हणून संपूर्ण देशात त्यांची ओळख होती. मात्र आज त्यांचे दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे निधन झाले आहे.
एम. एस. स्वामीनाथन हे कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. 1972 ते 1979 या काळात त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदावर काम केले होते. त्यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी धान्याच्या अधिक सुपीक जाती विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे त्यांची गणना भारतातील महान कृषी शास्त्रज्ञांमध्ये केली जाते.
दरम्यान, स्वामीनाथन यांना 1987 मध्ये पहिला जागतिक अन्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यासोबतच ते HK फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार आणि इंदिरा गांधी पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि अल्बर्ट आईनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. आज त्यांच्या जाण्याने कृषी क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.