कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अनेक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांच्या दळणवळणासाठी उपयुक्त असलेला आणि भरावाच्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांनी बांधलेला ढेबेवाडी विभागातील दुर्गम कसणी गावाजवळचा पूल पावसाचा जोर वाढल्याने पाण्याखाली जाण्याची भीती आहे. भराव टाकलेला वाहून जाण्याची भीती असून वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलापलीकडील कसणी घोटील, निगडे, महेंगडेवाडीसह अनेक वाड्यावस्त्या संपर्कहीन होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी कालपासून पाण्यात उतरून वाळूने तुंबलेल्या पुलाच्या पाईप मोकळ्या करण्याचे काम हाती घेतले आहे.
ढेबेवाडी खोऱ्यातील निवी- कसणी, घोटील, निगडे, माईंगडेवाडी आदीसह 25 हून अधिक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांना जोडणारा पवारवाडी- म्हाईंगडेवाडी हा मार्ग आहे. या मार्गावरून वाहनांची नेहमी ये- जा सुरू असते. पवारवाडी जवळचा कमी उंचीचा पूल पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने दोन वर्षांपूर्वी अवघ्या चाळीस दिवसात नवा पूल बांधण्यात आला होता. मात्र याच मार्गावर पुढे कसणी जवळ असलेल्या कमी उंचीच्या धोकादायक पुलाकडे दुर्लक्ष केल्याने दळणवळण ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातील समस्या तशीच राहिली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीने हा पूल उध्वस्त झाला होता. यामुळे कसणी खोऱ्यातील गावागावातील नागरिकांना तसेच शाळेसाठी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात अडकून पडावे लागले. त्यानंतर या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र, नवीन पूल बांधण्यात आला नसल्याने यावर्षीही हा पावसाळा गावांसाठी त्रासदायक ठरणार आहे.
सध्या पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत वाढ होऊन पुलावरून पाणी जाण्याची चिन्हे दिसत होती. पुलावरून पाणी गेल्यास एसटी सेवा ही ठप्प होण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी पुरात उतरून गाळ व वाळूने तुंबलेल्या ओढ्यांच्या पाईप रिकाम्या केल्या. सरपंच महेंद्र गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग मेथे- पाटील यांच्यासह ग्रामस्थ या मोहिमेत उस्फूर्त सहभागी झाले होते. या कामासाठी जेसीबीची ही मदत घेण्यात आली.