हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रातही अशांततेची भीती व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली. नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित ‘सामाजिक एकता परिषदे’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझ्याशी कोणाच्यातरी संभाषणात मणिपूरचा उल्लेख झाला. त्यावर देशाच्या संसदेतही चर्चा झाली. मणिपूरचे विविध जाती, धर्म, भाषांचे लोक आम्हाला भेटायला दिल्लीत आले. हे चित्र काय सांगतं? पिढ्यानपिढ्या एकसंध असलेला प्रांत अशांत झाला, घरे पेटवली गेली. पिढ्यानपिढ्या एकत्र राहून सौहार्द जपणारे मणिपुरी आज एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. आज एवढं मोठं संकट राज्यावर आलेलं असताना त्याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे.पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार पुढे म्हणाले, आज जे काही घडले, त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी तिथे जाऊन जनतेला दिलासा द्यावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. हा प्रकार मणिपूरमध्ये घडला. शेजारील राज्यांमध्येही असेच घडले. कर्नाटकातही तेच दिसले आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही असेच घडण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला समरसतेची आणि समतेची दिशा देणाऱ्या अनेक दिग्गजांचा वारसा आहे.”असे शरद पवार यांनी म्हंटल.