पुणे । कोरोना महामारीच्या संकटामुळं देशभरातील सर्व शैक्षिणक संस्था बंद आहेत. कोरोनाचा मोठ्या उद्योगांपासून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळं अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सरकारकडून फी माफीचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, सरकारच्या आवाहनाला कानाडोळा करत पुण्यातील स्वायत्ततेचा दर्जा असलेल्या फर्ग्युसन कॉलेजने द्वितीय वर्षाच्या शैक्षणिक फीमध्ये तब्बल १५० टक्के वाढ केली आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या फी वाढीला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला आहे. कोरोनामुळं कॉलेज बंद असतांना फी वाढ करणे हा अन्याय असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.
फर्ग्युसन कॉलेजने सर्व ८ शाखांच्या द्वितीय वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात १५० टक्क्यांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाची फी २ हजार ४७० इतकी होती. तीचं फी यंदा द्वितीय वर्षात प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना २०२०-२१ शैक्षणिक वर्षाकरिता ६ हजार ७० रुपये इतकी भरावी लागणार आहे. ही फीवाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल १५० टक्के इतकी आहे. तर विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाची फी गेल्या वर्षी ३ हजार ५५व इतकी होती. ती यंदा ७ हजार ५० रुपये इतकी भरावी लागणार आहे. म्हणेजेचं गेल्या वर्षीच्या विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाची फीमध्ये ९८ टक्के वाढ फर्ग्युसन कॉलेजने केली आहे.
दरम्यान, कोरोनामुळं गेल्या ७ महिन्यांपासून फर्ग्युसन कॉलेज बंद आहे. फर्ग्युसनमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळं हे सर्व विद्यार्थी सध्या आपापल्या गावी आहेत. या काळात कॉलेज कॅंपस, आणि इतर सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नसताना फी वाढ कशासाठी असा सवाल विद्यार्थी कॉलेज प्रशासनाला विचारात आहेत. याशिवाय २०१६ विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आणि विद्यापीठाकडून फर्ग्युसन कॉलेजला केवळ शैक्षणिक स्वायत्तता मिळाली आहे. आर्थिक बाबतीत निर्णय घेण्याची किंवा पूर्ण स्वायत्तता फर्ग्युसन कॉलेजला प्राप्त नाही. तरीही गेल्या ३ वर्षांपासून कॉलेज प्रशासन फी वाढ करत असल्याचे आंबेडकरीयट स्टूडेंट ऑरगनायझेशनच्या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे. एप्रिल महिन्यात कोरोनामुळं फी भरणं आर्थिक अडचणीमुळं भरता येत नसल्याने यंदाची फी माफ करावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाला केली होती. मात्र, कॉलेज प्रशासनाने या विनंतीला कोणताही प्रतिसाद न देता भरमसाठ फी वाढ केल्याने विद्यार्थांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
सदर फी वाढ ही कशासाठी करण्यात आली आहे याबाबत कॉलेज प्रशासनाकडून ठोस कारण दिलं जात नाही आहे. या फी वाढीमागे घेण्यासाठी आंबेडकरीयट स्टूडेंट ऑरगनायझेशन आणि द्वितीय वर्षाचे अन्य विद्यार्थी वारंवार मेलद्वारे कॉलेज प्रशासनाला मागणी करत आहेत. मात्र, कॉलेज प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आहे असं विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे. दरम्यान, या फी वाढी विरोधात आंबेडकरीयट स्टूडेंट ऑरगनायझेशन आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मोहीम उघडली असून. या फी वाढीविरोधात तब्ब्ल २०० विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. यंदाच्या फी माफीसह आधीची फी स्ट्रक्चर पूर्ववत करावे अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”