सांगली | खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री करू नये. खतांचा काळाबाजार करू नये तथा भेसळ युक्त खते शेतकऱ्यांना विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी सांगली येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल 21 लाखांचा खतांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगली शहरामध्ये ग्लोबल इम्पोर्टस येथे मालक तोसिफ नसीर मार्फानी हे शेतकऱ्यांना व किरकोळ उत्पादकांना तसेच काही कृषी सेवा केंद्राना अनाधिकृतपणे खाते विकतात अशी गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्ह्यास्तरीय भरारी पथकाने ग्लोबल इम्पोर्टसच्या कार्यालयात छापा टाकला होता. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात माग्नेशीअम सल्फेट , फेरस सल्फेट , सल्फर , बोरॉन , झिंक सल्फेट , कॅल्शीयम नायट्रेट या सूक्ष्मअन्नद्रव्यांची तसेच खतांचे नमुने आढळून आले.
याठिकाणी तब्बल 84 मेट्रिक टन 350 किलो इतका साठा आढळून आला . ग्लोबल इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी यांच्याकडे विक्री परवाना व खरेदी पावत्या मागणी केली असता त्याच्याकडे उपलब्ध नव्हती. सविस्तर चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. संबंधितावर संजयनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याठिकाणाहून तब्बल 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.