कराड | महाराष्ट्रातलं शेबंड पोरंगही म्हणत आहे, 50 खोके एकदम अोके. वास्तविक आता अनेकांच्या मनात शंका येत आहे, एवढा यांना पैसा मिळाला आहे. इतर टक्केवारीही चालू आहे. तेव्हा आता हे या पैशाचे काय करणार, मित्रांनो पापाचा पैसा आहे, तो राहत नाही कधी असे म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी टीकास्त्र सोडले.
गुजरवाडी- म्हावशी (ता. पाटण) येथील विविध विकासकामांचा भुमिपुजन व उद्घाटन सोहळा सातारा जिल्हा मध्य. सह. बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी ते बोलत होते. येथील गावकऱ्यांच्या हस्ते माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पं.स. सदस्य सौ. उज्ज्वला लोहार, पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, पाटण अर्बन बॅंकेचे संचालक दिनकरराव घाडगे, अविनाश घाडगे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन हिंदुराव सुतार, सरपंच शंकरराव घाडगे, उपसरपंच सर्जेराव घाडगे, विलासराव घाडगे, वाय.के. घाडगे, अधिक चव्हाण, राजाराम मोळावडे, संदीप लोहार, शंकर पवार, तुकाराम पवार, रामचंद्र पवार, तुकाराम किसन पवार, रामचंद्र धोंडी पवार, नथुराम पाबळे, शिवाजी चव्हाण, विठ्ठल पवार, तसेच प्रमुख मान्यवर, म्हावशी-गुजरवाडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, सत्यजिंतसिंह हा फक्त माझा वारसदार नाहीत, तर माझ्या विचारांचाही वारसदार आहेत. जो विचार घेऊन मी गेली अनेक वर्षे पाटण तालुक्यात काम केले. तोच विचार घेऊन आज सत्यजितसिंह जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुया आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकवुया. तसेच सत्यजितसिंह माझ्या विचारांचा आदर्श घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत विकासकामे पोहचवत आहेत. आपण सर्वांनीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना ताकद दिली पाहिजे. त्याचबरोबर मुंबई-पुणेकरांनी गावाकडे आल्यावर गावातील विकासकामे करणाऱ्या नेतृत्वाला ताकद द्यावी. गावागावात भांडणे लावणाऱ्या, तरुणांची माथी भडकवणाऱ्या, तरुणांना व्यसनी बनवण्याऱ्या तथाकथित नेत्यांना गावापासून दूर ठेवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
50 खोक्यांच्या मागे पळणारा नेता
सध्या राजकारणाचा बाजार झाला आहे. तो थांबवला पाहिजे. जे स्वतःच्या पक्षाचे, नेत्यांचे झाले नाहीत; ते जनतेचे काय होणार? असा सवाल उपस्थित करत जनतेसाठी विकासकामांच्या मागे पळणारा नेता योग्य असतो. 50 खोक्यांच्या मागे पळणारा नाही, असा टोमणाही माजी मंत्री पाटणकर यांनी नाव न घेता विरोधकांना मारला.