पन्नास लाख ः सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान तर देगांव, मान्याचीवाडीची गुणवत्तेत निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागातील एकूण 16 ग्रामपंचायतींना विविध गटांमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पंचायतराज दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायतराज मंत्री उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह राज्यातील ग्रामपंचायतीचे प्रमुख उपस्थित होते. आज झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील एकूण 313 पंचायतींना सन्मानित करण्यात आले.

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2021 (पडताळणी वर्ष 2019-20) हा राज्यातून सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) व राहाता (जि.अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांना ऊत्कृष्ट कार्यासाठी ऑनलाइन रोख रकम देऊन सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये रोख ऑनलाइन माध्यमाने खात्यात जमा करण्यात आले. तर, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये रोख रकम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

यासह राज्यातील 14 ग्रामपंचायतीच्या कामाच्या गुणवत्तेनुसार या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यामध्ये मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), चंद्रपूर (ता. राहाता. जि. अहमदनगर), लोहगाव (ता. राहाता. जि. अहमदनगर), जाखोरी (ता. जि. नाशिक), गोवरी (ता. मौदा, जि. नागपूर), नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक), येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर), मरोडा (ता. मूल, जि.चंद्रपूर), तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर), लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती), वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली), देगांव (ता. वाई, जि. सातारा), अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) या 14 ग्रामपंचायती आहेत. या 14 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.

मान्याचीवाडीला नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार

नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2021 हा राज्यातून मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या ग्रामपंचायतीस 10 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार 2021 हा राज्यातून लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.

सिरेगावला बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार

राज्यातून सिरेगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) या ग्रामपंचायतीस बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले. या ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आलेली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment