कोरोनविरुद्धचा लढा आता प्रत्येक भारतीयासाठी जीवनावश्यक बनला आहे. देशातील विमानतळावर महिनाभरापूर्वीच प्रवाशांची व्यवस्थित तपासणी करुन त्यांना सोडलं असतं तर कदाचित कोरोनाचा भारतात इतका फैलाव झाला नसता. केरळमध्ये कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण सापडल्यानंतर केरळने नक्की काय उपाययोजना केल्या? तिथल्या कष्टकऱ्यांसाठी केरळ सरकारने काय पावलं उचलली? याचा आढावा अनाडोलू एजन्सीसाठी इफ्तिखार गिलानी यांनी घेतला. हॅलो महाराष्ट्रसाठी जयश्री देसाई यांनी मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद केला आहे.
पार्श्वभूमी – भारतातील दाट लोकसंख्या असणारी राज्ये कोरोना विषाणूची साखळी तोडत आहेत. दक्षिणकडील केरळ हे राज्य दक्षिण आशियातील देशांना लोकांच्या जीवनमानावर परिणाम न करता या साथीच्या रोगावर मात करण्याचे धडे देत आहे. कोरोना विषाणू हा साथीचा रोग सध्या दक्षिण आशियातील सर्वच देशांमध्ये तेथील दाट लोकसंख्या आणि कमकुवत पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हाने निर्माण करत आहे. अशामध्ये भारतातील दक्षिणेतील राज्य केरळ जिथे covid-१९ चा पहिला रुग्ण सापडला होता, इतर प्रदेश आणि त्यांच्या नेत्यांना धडे देत आहे.
तज्ञांचे असे मत आहे की, दक्षिण आशियातील गरिबी आणि अज्ञान हे निदान, तपासणी आणि वेगळे राहण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणत आहे. या राष्ट्रांमधील सर्व नेते मोठ्या पेचात अडकले आहेत. चीन, इटलीसारख्या देशाप्रमाणे संचारबंदी लागू केली असता विषाणूची साखळी खंडित होऊ शकेल पण अन्न साखळीवर त्याचे तीव्र परिणाम होतील. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असणारे केरळ हे साधारण साडेतीन कोटी लोकसंख्येचे राज्य असून दाट लोकवस्ती असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. भारताच्या प्रतिचौरस किलोमीटर परिसरात साधारण ४२० लोक राहतात. या घनतेच्या तुलनेत या राज्यात प्रतिचौरस किलोमीटर परिसरात ८६० लोक राहतात. केरळमधील साधारण ३५ लाख लोक परदेशात, बहुधा आखाती देशांमध्ये नोकरी करतात.
चालू स्थिती – २०१८ सालच्या निपाह विषाणूची साथ आणि मागील वर्षीची पूर परिस्थिती हाताळलेले माजी आरोग्य सचिव अमर फेटल म्हणतात, “या परिसरात मोठ्या प्रमाणात या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.” या ठिकाणी १७ जानेवारी रोजी इशारा देऊन ३ फेब्रुवारीला वैद्यकीय आपात्काळाची घोषणा करण्यात आली. विमानतळावरील तपासणीही लवकर सुरु करण्यात आली. आरोग्य विभागाच्या मते साधारण ४०,००० लोकांना त्यांच्या घरीच पाळतीवर ठेवण्यात आले. आतापर्यंत या राज्यात ९५ covid -१९ च्या सकारात्मक केसेस सापडल्या आहेत.
उपाययोजना – अनाडोलू या एजन्सीशी फोनवर बोलताना राज्याचे आरोग्य सचिव डॉ. रंजन खोब्रागडे म्हणाले, “या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे प्रमुख श्रेय येथील विमानतळावरील तपासणी आणि नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याचे आहे. शिवाय संचारबंदी लागू करण्यापूर्वी आणि लोकांना वेगळे राहण्यास सांगण्याआधी सरकारने २०० दशलक्ष रुपये (२.६ अब्ज डॉलर) हे राज्यावर येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि या साथीच्या आजारात गमावल्या जाणाऱ्या नोकऱ्यांसाठी जाहीर केले आहेत. ‘मार्च महिन्याच्या निकषांची पर्वा न करता संपूर्ण लोकसंख्येला आम्ही मोफत राशन पुरवठा करत आहोत.’ असेही ते म्हणाले. शेजारील राज्यांप्रमाणे केरळमध्ये आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा अभाव आहे. मात्र मानव विकास निर्देशकांत हे राज्य अव्वल आहे. २०११ साली झालेल्या भारतीय जनगणनेनुसार दक्षिण आशियातील १०० टक्के साक्षरता आणि उल्लेखनीय लिंग गुणोत्तर असणारे हे राज्य आहे.
एक पाऊल पुढे – आरोग्य यंत्रणेवर येणारा भार कमी करण्यासाठी राज्यातील वैद्यकीय संघटनेच्या ८०० सदस्यांची पथके जिल्हा आरोग्य मुख्यालयात पाठविण्यात आली आहेत. राज्यात मास्क आणि औषधांची कमतरता भासू नये म्हणून आधीच राज्यातील तुरुंगात असणाऱ्या कैद्यांना त्याचे उत्पादन करण्यास सांगण्यात आले होते. “आम्ही त्यांना सर्व प्रकारचा कच्चा माल पुरविला आणि तीन दिवसांमध्ये त्यांनी ६००० मास्क आणि हजारो लिटर सॅनिटायझर तयार करून दिले, असे आरोग्य सचिवांनी यावेळी सांगितलं. सर्व शैक्षणिक संस्था बंद असतानाही साधारण ३,७५,००० मुलांना दुपारचा पोषण आहार त्यांच्या घरी पोहोच केला जात आहे. भारतातील सर्व शाळातील मुलांना दुपारचा आहार देणे बंधनकारक आहे मात्र घरपोच आहार पोहिचविण्याचा हा एक नवीन प्रयोग आहे.
जास्त गरजेचं – साधारण दहा वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या सर्व शाळा आणि हॉटेल्सना अन्न पुरविणाऱ्या कुडुंबश्री बचत गटाच्या संस्थेकडे या सामुदायिक स्वयंपाक घराची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच या संस्थांना २० रुपयांपेक्षा (०.२६ डॉलर) जास्त किंमतीत आहार देण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय टेलिकॉम चालकांना ब्रॉडबँड व्यवस्था बळकट करण्यास सांगण्यात आली आहे. ज्यामुळे नागरिकांना घरी बसून काम करणं शक्य होणार आहे. राज्यातील ग्रंथालयंसुद्धा लोकांना वेगळे राहण्याच्या (आयसोलेशन) काळात पुस्तके पुरविण्यासाठी उशिरापर्यंत काम करतात. तसेच संक्रमित व्यक्तीचे मन गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना वेगळे ठेवल्याच्या काळात लॅपटॉप आणि इतर संपर्क साधने वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठे शहर कोची येथे मास्क पुरविण्यासाठी तसेच सॅनिटायझरचा फवारा करण्यासाठी दोन रोबोट तैनात करण्यात आले आहेत.
संचारबंदी आणि गरीब लोक – अर्थव्यवस्थेला पूर्णतः धक्का देत या ठिकाणी संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील साधारण २४. ६ % जनता ही आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली येते (१. ५ डॉलर प्रति दिवस). भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार देशाची २१.९% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली येते. आशियाई विकास बँकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील २४. ३% जनता ही दारिद्रय रेषेखाली येते. या देशांमधील नेते जनतेला स्वतःच वेगळे राहून आपले निरीक्षण करण्यास सांगत आहेत. कारण संपूर्ण संचारबंदीमुळे कदाचित दारिद्र्यरेषेखालील लोकांना फटका बसून लोकांचा उपासमारीमुळे बळी जाईल अशी भीती त्यांना वाटते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रोजंदारीवर संचारबंदीचे विपरीत परिणाम होतील म्हणत आम्हाला ते परवडणार नाही असे सांगितले.
देशाला संबोधित करीत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच पद्धतीने संदेश दिला. ते म्हणाले कोरोना विषाणूचे वाढते संकट हे भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्येच्या विकसनशील देशासाठी सामान्य समस्या नाही.
आरोग्यव्यवस्था सुधारलीच पाहिजे – भारताच्या आरोग्य मंत्रालयाने मिळविलेल्या माहितीनुसार दर ८४,००० लोकांमागे एक आयसोलेशन बेड आणि दर ३६,००० लोकांमागे एक वेगळा बेड आहे. कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या माहितीनुसार दर ११,६०० भारतीयांमागे एक डॉक्टर उपलब्ध आहे आणि १८२६ लोकांमागे दवाखान्यातील बेड उपलब्ध आहे. तर संपूर्ण भारतात केवळ ४०,००० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आरोग्य अहवालानुसार देशात १,५४,६८६ नोंदणीकृत डॉक्टर आणि ७,३९,०२४ सरकारी दवाखान्यातील बेड आहेत. दक्षिण आशियाई देशातील परिस्थिती काहीशी अशीच किंबहुना वाईट आहे. एकूणच या देशातील नेत्यांनी केरळ सरकारने या विषाणूची साखळी तोडण्यासाठी उचललेली पावले लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच अन्नसाखळी अबाधित राहावी म्हणजे लोक उपासमारीला सामोरे जाणार नाहीत यासाठी केलेल्या प्रयत्नातून धडा घेतला पाहिजे.
जयश्री देसाई या मुक्त पत्रकार असून त्यांना अनुवाद, शब्दांकन यात विशेष स्वारस्य आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी काही काळ काम केलं असून त्या उत्तम voice over आर्टिस्टही आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक – 9146041816