हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. चिंचवडमध्ये मतदानादरम्यान हाणामारी झाल्याने या पोटनिवडणुकीला गालबोट लागलं आहे. माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपळे गुरव मतदान केंद्रावर सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी दोन्ही समर्थकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळालं. त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांमधील वाद मिटला.
दरम्यान, दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे त्यांना टक्कर देतील. मात्र या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत आले ते म्हणजे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे. उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीनंतर सुद्धा कलाटे यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकल्याने महाविकास आघाडी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कलाटे यांच्या उमेदवारीचा फटका महाविकास आघाडीला बसणार की भाजपला हे निकालानंतरच खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल. २ मार्च ला कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल.