औरंगाबाद – आई शेवटी आईच असते ती मुलांना कधीच दु:खी पाहू शकत नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता एका 63 वर्षी आईने आपल्या विवाहित 40 वर्षीय मुलीला किडनी देत जीवदान दिले आहे नवीन वर्षात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया औरंगाबादेत झाली. 63 व्या वर्षी आईने आपल्या मुलीसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाची घटना सिल्लोड तालुक्यातून पुढे आली आहे.
सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथील छाया अशोक झरवाल (40) या गेल्या 3 वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या अचानक निकामी झाल्याने औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले. गेल्या सहा महिन्यांपासून डायलिसिस प्रक्रियेवर छायाबाई जगत होत्या. पण ही प्रक्रिया जास्त काळ रुग्णाला वाचू शकत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. छायाबाईच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने पुढे काय करावे असा प्रश्न त्यांना पडला होता. छायाबाई सहा त्यांच्या कुटुंबावर किडनी दाता आणायचा कुठून, असे एक ना अनेक प्रश्न पडत होते. त्यातच छायाबाईची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने निर्णय घेण्याचे नातेवाइकांना सांगितले होते.
या घटनेची माहिती छायाबाई यांच्या आई रुखमनबाई माहोर (63) यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली किडनी मुलीस देण्याचा निर्णय घेतला. आई कधी आपल्या मुलांना दुखी बघू शकत नाही. त्यामुळे रुखमनबाई यांनी ना आपल्या वयाचा विचार केला ना परिस्थितीचा क्षणात मुलीला किडनी देण्यासाठी ता रुग्णालयात हजर झाल्या. शनिवारी औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. छायाबाई त्यांची आई रुक्मिणीबाई या माय लेकीची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहेत.