हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकारने झुकते माप घेत ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना सुट मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा साखर कारखानदारांना होणार आहे.
सध्या देशात साखरेच्या दरात मोठी वाढ होत चालल्यामुळे तसेच ऊस उत्पादनात घट झाल्यामुळे केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. सरकारकडून निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. मुख्य म्हणजे, या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल” असा अंदाज सरकारकडून वर्तवण्यात आला होता. परंतु याच निर्णयाला साखर उत्पादक आणि कारखानदारांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्यामुळे शेतकरी आणि कारखानदार रस्त्यावर उतरले होते. या निर्णयाला विरोध दर्शवत राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होते. इतकेच नव्हे तर, केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. राज्यामध्ये या सर्व घडामोडी घडल्यानंतर तसेच निर्णयाला होत असलेला विरोध पाहून सरकारने आपला निर्णय मागे घेतला आहे. या एका निर्णयामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.