पुणे प्रतिनिधी । ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात वरून मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात मजूर दबले गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तीन अग्निशामक जवानांच्या अंगावरही मातीचा ढिगारा पडल्याने गाडले गेले. या घटनेत अग्निशमन दलाच्या जवानासह एका मजुराचा मृत्यू झाला आहे. सदर दुर्घटना दापोडी येथे रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
विशाल जाधव आणि नागेश कल्याणी जमादार अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जाधव हे अग्निशामक दलाचे जवान असून जमादार हे मजूर आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील विनियार्ड चर्चच्या पाठीमागील बाजूस ड्रेनेज लाइनसाठी एक खड्डा खोदला होता. या वीस फूट खोल खड्ड्यात काही मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली काही मजूर दाबले गेल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान , मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने मजूर जमादार हे दबले गेले, त्यांना काढण्यासाठी गेलेल्या दोन नागरिकांच्याही अंगावर मातीचा ढिगारा पडला. दोन नागरिकांची सुखरुपरित्या सुटका केल्यानंतर अग्निशामक दलाकडून जमादार यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र अचानक अग्निशामक दलाच्या जवानांच्या अंगावरही मातीचा ढिगारा कोसळला. त्यात तीन जवान दबले गेले. यापैकी दोन जवानांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलास यश आले. त्यानंतर विशाल जाधव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफ यांच्या पथकाने पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जमादार यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हे शोधकार्य समाप्त झाले. या शोध व बचावकार्यात पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, एनडीआरएफ, आर्मी पोलीस, शासन आणि मनपाचा वैद्यकीय विभाग, पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (तहसीलदार), स्वयसेवी संस्था आणि पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, आदी सहभागी होते.