म्हणुन रोहित पवार आणि विश्वजीत कदमांची गाडी खेळण्यांच्या दुकानासमोर थांबली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र| गेले दोन महिने राज्यातील राजकीय नेते मंडळी आधी निवडणूक आणि नंतर प्रदीर्घ काळ चाललेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यात अडकून पडली होती. निवडणुकांचा प्रचार, निवडणूक निकाल इतकेच नाहीतर सत्तास्थापनेच्या तिढ्यात आमदार फुटू नाही म्हणून पक्षाकडून झालेली हॉटेल कोंडी यासर्वात या आमदार राजकारणी मंडळींची दमछाक झाली. दरम्यान याकाळात पक्षकुटूंबाकडे लक्ष देता-देता आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे यासर्वांचं दुर्लक्ष झालं. आमदार,मंत्री म्हटलं कि खासगी आयुष्याला बहुतेक वेळा मुरुड घालावीच लागते ही एक कटू बाजू राजकारणाची आहे. आपल्या पोराबाळांचा स्नेह, त्यांच्यासोबत वेळ घालवणं हा भाग कमीच नशिबी त्याचा येतो. मात्र, कुठंतरी या धकाधकीत आपल्यातला बाप जिवंत ठेवत आपलं कर्तव्य ते पार पडतात. ते आपल्या मुलांच्या भाबळ्या प्रेमापोटी. असाच एक प्रसंग आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजित कदम यांच्या आयुष्यात घडला. बघायला गेलं तर दोघेही तरुण आमदार दोघंही विवाहित, दोघांनाही मुलंबाळं. मात्र, या सत्ताकारणाच्या व्यापात आपल्यातला हळवा बाप अजून जिवंत आहे अशा आशयाची पोस्ट रोहित पवार यांनी फेसबुक वर टाकली. सध्या रोहित आणि विश्वजीत दोघेही सध्या सत्तास्थापनेच्या काळापासून मुबंईत आहेत. मात्र, या धकाधकीत सुद्धा त्याच अर्ध लक्ष घराकडं लागून आहे. दोघेही एकत्र मुंबईत प्रवास करत असतांना एका खेळण्याच्या दुकानात जाण्याचा त्यांना मोह आवरला नाही. त्याच्यातील बापाने त्यांना दुकानाकडं खेचलं. मात्र, हे करत असतांना त्यांच्या मनात काय भावना होत्या हे रोहित पवार यांनी शब्दांच्या माध्यमातून फेसबुक पोस्ट करत व्यक्त केलं. खाली लिहलेली पोस्ट जरूर वाचा.

गेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या इच्छेनुसार आपल्यालाच यश मिळालं. परवा दिवशी बहुमताने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले, काल अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने मी असेन किंवा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आम्ही सर्वजण या घडामोडींचा भाग होतो. आम्हा युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता.

कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.

आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल.

Leave a Comment