रात्री ‘या’ वेळेतच वाजवा फटाके; अन्यथा होणार कारवाई

nikhil gupta
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – रात्री आठ ते दहा या दोन तासातंच फटाके वाजवा, फटाक्यांच्या माळा लावू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत दिला आहे. सर्वोच्च न्यायालय, हरित लवादाचे आदेश पाळा, शांततामय जीवनाचा नागरिकांचा हक्क अबाधित राहण्यासाठी सुधारित, हरित फटाक्यांचाच आग्रह धरा, फटाके घेताना सुधारित, हरित फटाकेच दुकानदाराला मागा आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहनही डॉ. गुप्ता यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, महापालिका अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड आदींची उपस्थिती होती. फटाक्यांच्या माळा फोडण्यास सक्त मनाई असून रुग्णालये, न्यायालये, नर्सिंग होम, धार्मिक स्थळे, शाळा महाविद्यालये आदींच्या १०० मीटर परिसरात फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजविण्यास परवानगी असल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले. फटाक्यांचा आवाज १२५ डेसिबलपेक्षा अधिक राहणार नाही, हेही लक्षात घेण्याचे सांगतानाच नियम तोडून फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारा विरोधातही पोलिस आयुक्त कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालय संयूक्त कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

हे फटाके घेऊच नका
फटाके घेण्याआधी बेरिअम साल्ट, लिथियम, मर्क्युरी या पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या, तसेच आरोग्यास हानिकारक असणारे फटाके न घेण्याबाबत दुकानदारास सांगा, असे म्हणत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिवाळी सणापूर्वी आणि नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हवेच्या शुद्धतेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे नमूद केले.