नांदेड : शहरात अनलॉकनंतर गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली असून लुटीच्या घटना नित्यनेमाने घडत असल्याचे दिसत आहे. मिल्लतनगर येथे दोघांनी पिस्टलमधून हवेत गोळीबार करून मायक्रो फायनन्सच्या कर्मचाराल्या लुटल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेने पोलिस दल हादरले असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण मायक्रो फायनन्सच्या कर्मचारी रोहित गुगले हे बचतगटाची बैठक आटोपून फायनन्सची 57 हजारांची रोख रक्कम बॅगेत टाकून घेऊन जात होते. जाताना मिल्लतनगर भागातील एका शाळेजवळ आले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडवून हवेत गोळीबार केला.
पिस्तुल धारकांनी त्यांच्याजवळील बॅग हिसकावली आणि पळुन जाण्यात ते यशस्वी झाले. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलिस अधीक्षक निलेश मोरे, पोलिस उप अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे,सहायक पोलिस निरीक्षक पांडुग भारती यांनी घटनास्थळी भेट दिली.