मुलींची पहिली बॅच : सातारा सैनिक स्कूलमध्ये देशातील 10 मुलींना प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने 23 जून 1961 रोजी देशातील पहिली सैनिक स्कूल शाळा साताऱ्यात सुरू झाली. लष्करी दलांना प्रमुखांसह सर्वोत्तम अधिकारी देणाऱ्या सैनिकी शाळेमध्ये आता मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. सातारा सैनिक स्कूलमध्ये सुमारे 10 मुलींना प्रवेश देण्यात आला असून सैनिक स्कूलमधील मुलींची पहिली बॅच तयार झाली आहे. त्यामुळे सैनिक स्कूलमधून आता महिला अधिकारी घडण्यास मदत होणार आहे. मागील 61 वर्षांत पहिल्यांदा मुलांच्या बरोबरीने मुलींनाही सैनिकी शिक्षण या शाळेत दिले जाणार आहे.

सातारा सैनिकी स्कूल मध्ये 6 वी ते 12 वीचे शिक्षण निवासी शाळेमध्ये दिले जाते. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी 1450 मुलींनी 10 जागांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 611 विद्यार्थिनींनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यामधून 10 विद्यार्थींनीची निवड करण्यात आली असून 2 पश्चिम बंगाल व उर्वरित 7 महाराष्ट्र मधील आणि एक बिहारची विद्यार्थिनी आहे. या स्कूलमधील विद्यार्थींनी 12 वीनंतर या दहा मुली एनडीएसाठी पात्र ठरणार आहेत.

यंदा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये प्रवेशासाठी देखील पहिल्यांदाच मुलींसाठी देखील परीक्षा सुरू करण्यात आली आहे. 14 नोव्हेंबरला झालेल्या सी डी एस ई लेखी परीक्षेत 1002 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व मुलींच्या आता बौद्धिक, शारीरीक आणि मानसिक क्षमतेच्या चाचण्या होणार आहेत आणि या चाचण्यांमधून केवळ 19 जणींना एनडीएमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच 2023 पासून सुरु होणार आहे.