हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्रात गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, आता मुंबईतही GBS चा पहिला बाधित रुग्ण आढळून आला आहे. अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या एका पुरुषाला GBS ची लागण झाली आहे. त्याच्यावर सेव्ह हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, मुंबई महानगरपालिकेने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अन्य भागात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे अधिक रुग्ण आढळले आहेत. या आजारामुळे आतापर्यंत राज्यभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व प्रकारे खबरदारी घेण्यात येत आहे. यासह नागरीकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, गुईलेन बॅरे सिंड्रोम हा शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारा आजार असून तो संसर्गजन्य नाही. परंतु दूषित अन्न-पाण्यामुळे हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी पाळाव्यात, उकळलेले किंवा शुद्ध पाणी प्यावे आणि अर्धवट शिजवलेले मांसाहारी पदार्थ टाळावेत, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
प्रशासनासमोर नवे आव्हान
राज्यात जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे. सध्या जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किमान पाच बेड राखीव ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, गुईलेन बॅरे सिंड्रोम टाळण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यामुळे दूषित अन्न व पाणी टाळावे, योग्य प्रकारे स्वच्छता राखावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.