औरंगाबाद – दगड मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास योजना राबविण्यात येतात. गरीब कुटुंबियांसाठी स्वत:चे हक्काचे सुरक्षित घर असणे ही त्यांच्यासाठी आयुष्यात महत्वपूर्ण बाब आहे. अधिकाऱ्यांनी विविध घरकुल योजना राबवतांना केवळ प्रशासकीयदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्या विचार करुन काम करावे जेणेकरुन योजनेच्या कामाच ओझ वाटणार नाही असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल केले
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, सहायक उपायुक्त (विकास) विना सुपेकर, विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, सरपंच, ग्रामसेवक, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) औरंगाबाद जिल्हा परिषदेत प्रथम पुरस्कार उस्मानाबाद द्वितीय तर हिंगोली जिल्हा परिषदेला तृतीय पुरस्कार देण्यात आला.